प्रभू रामचंद्र रावणाचा पराभव करून अयोध्येला परत आले तेव्हा
सर्व अयोध्यावासीयांनी गुढ्या-तोरणे उभारून त्यांचे स्वागत केले! तोरण हे
मांगल्याचे प्रतीक आहे, तर गुढी हे विजयाचे प्रतीक आहे. खालच्या पातळीवरून वरच्या
पातळीवर उठणे हा खरा विजय. दगडाच्या अवस्थेतून प्राणी, प्राण्यातून मनुष्य, अन्
मनुष्यातून देव (नराचा नारायण) अशा उत्क्रांतीचे प्रतीक म्हणजे गुढी. आजच्या दिवशी
अहंकाराचा नाश झाला, राक्षसत्वाचा नाश झाला व स्त्रीप्रतिष्ठा, सृजनप्रतिष्ठा
पुन्हा प्रस्थापित झाली. तेव्हापासून गुढीचा सण साजरा करण्याची प्रथा सुरू झाली.
खरे तर आध्यात्मिक प्रगतीची गुढी असते. चांगल्या जीवनाची
अंतिम पायरी म्हणजे आध्यात्मिक उंची गाठणे. ज्ञानाची उपासना करणाऱ्या ऋषिमुनींचे
कार्य म्हणजे मनुष्याच्या कल्याणाचे असलेले सगळे मनुष्यापर्यंत पोचवणे. त्यातूनच
एका ऋषींनी व्याकरण लिहिले, दुसऱ्याने आयुर्वेदाचे आरोग्यशास्त्र लिहिले,
तिसऱ्याने नाट्यशास्त्र लिहिले. मानवतेच्या हिताचे काम करणारे ते ऋषिमुनी व तीच
आध्यात्मिक प्रगती. स्वतःच्या इच्छा, वासना यांच्या पलीकडे जाऊन मनुष्यमात्राच्या
इच्छा पूर्ण होण्याच्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न केले. त्यांनी सगळ्या विश्वात
परमेश्वर पाहिला व "सर्वेऽत्र सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः' हे
लक्षात ठेवून कार्य केले. ही परंपरा म्हणजे गुढी.
पाण्याचा संयोग होऊन तयार झालेले सूक्ष्म जीव, जमिनीवर
सरपटणारे जीव, हवेत उडणारी चिलटे-मच्छर, प्राणी, पक्षी, जंगली प्राणी असे करत करत
शेवटी माणसाची उत्पत्ती झाली. प्रगती करण्यासाठी माणसाने काही प्राणी माणसाळवले.
आध्यात्मिक प्रगतीला सर्वांत मोठा अडथळा असतो भीतीचा, आणि सर्वांत मोठी भीती असते
मृत्यूची. मोठ्यात मोठा रक्ताला चटावलेला क्रूर वाघही अग्नीला घाबरतो. त्यामुळे
माणसाला अग्नीचा शोध लागल्यानंतर त्याची भीती कमी झाली. अग्नी टिकविण्यासाठी
माणसाला इलाज सापडला तेव्हा त्याची भीती एकदम कमी झाली. त्याच्या लक्षात आले, की
अग्नीसारखा अग्नी आपण माणसाळवू शकतो व त्याचा आपल्या कामासाठी उपयोग करून घेऊ
शकतो, तर वाघ-सिंहाची काय कथा! त्याने मांजर, कुत्रा, बकरी वगैरे प्राणी
माणसाळवले. अग्नीची प्राप्ती व अग्नीपासून संरक्षण हा मनुष्याच्या उत्क्रांतीतील
पहिला टप्पा. लहान मुलांना भीती वाटते तेव्हा आपल्याला कोणीतरी मदत करावी, आपले
कोणीतरी संरक्षण करावे अशी त्यांची अपेक्षा असते व तशी गरजही असते. त्यातूनच काहीही
न करता आपल्याला जास्तीत जास्त मिळावे ही प्रवृत्ती व धारणा निर्माण होते.
माझे-तुझे हा भाव उत्पन्न होतो व दुसऱ्याची भीती वाटते. त्याचप्रमाणे "माझे'
म्हणता येईल याची वृद्धी व्हावी, हा नैसर्गिक भावही त्यांच्यात असतो. या पहिल्या
भावाला "शूद्रवृत्ती' नाव दिले गेले. त्यानंतर शूद्रत्वाकडून वैश्यभाव, वैश्यभावाकडून
क्षत्रियभाव व क्षत्रियभावाकडून ब्राह्मणत्वभाव असे उत्क्रांतीचे पुढील चार टप्पे.
ब्राह्मणत्वभावाकडून मनुष्यमात्राच्या कल्याणाची योजना आखणारा हा मोक्षमार्ग,
मुक्तिमार्ग अशा तऱ्हेने उत्क्रांतीची कल्पना दृढ झाली. हे चार वर्णभाव जन्माने
मिळत नसतात; पण समाजाने स्वतःच्या सोयीसाठी म्हणा वा इतर कारणामुळे म्हणा,
शूद्राच्या पोटी जन्मलेला तो शूद्र, ब्राह्मणाच्या पोटी जन्मलेला तो ब्राह्मण अशा
तऱ्हेने एक समाजव्यवस्था तयार केली. प्रत्येक मनुष्य, मग तो कुणाच्याही पोटी जन्माला
येवो, त्याचे बालपण शूद्रभावातच असते. जसजसे बालक मोठे व्हायला लागेल तसे त्यात
वैश्यभाव, क्षत्रियभाव व ब्राह्मणत्वभाव हे उत्क्रांत व्हावेत, अशी अपेक्षा असते
व यातच त्या व्यक्तीचे व मनुष्यमात्राचे कल्याण असते.
प्रत्येक बालक शूद्र म्हणून जन्माला येते. प्रसरण पावणे, आराम
शोधणे व स्वतःसाठी काही मिळविणे हे शूद्र प्रवृत्तीचे गुण. लहान मुले पाय झाडतात.
पाय नेहमी ऍक्टिव्ह असतात, त्यामुळे अस्वस्थ असणारी माणसे येरझाऱ्या घालतात.
प्राणी नेहमी घाबरलेले असतात. वाघ-सिंह झाला तरी जरा कुठे खुट्ट झाले, की त्याला वाटते
आपला शत्रू आला की काय! माणसालाही भीती असल्याने मन अस्वस्थ असते. भीती, कमी समज,
तात्पुरत्या लाभावर समाधान व पायात शक्ती अधिक असणे हे शूद्रत्व. शक्तीचे उत्थान
करण्याच्या प्रयत्नात मूल आपल्या पायाचा अंगठा धरून तोंडात घालते. लहान मुलांना
व्यायाम करण्यासाठी मालिश करून त्यांचे पाय डोक्यापर्यंत नेले जातात, पायांची अढी
घालून एकमेकांवर दाबले जातात. जरा कळायला लागले, की लहान मुलांचा हात त्यांच्या
जननेंद्रियाकडे जातो. उपस्थ तोंडाशी जोडलेले असते, त्यामुळे दर दोन तासांनी मुलाला
खायला-प्यायला हवे असते. "मला खाऊ हवा' हा विचार आला, की खाऊ लगेच मिळाला
पाहिजे असे त्याला वाटते. खाऊ मिळाल्यावरच त्याचे समाधान होते. शूद्रप्रवृत्तीच्या
व्यक्तीसुद्धा थांबायला तयार नसतात. काम केल्याचा मोबदला मिळण्यासाठी ते महिनाभर
थांबायला तयार नसतात. दिवसा काम केले, की त्यांना संध्याकाळी मोबदला हातात हवा
असतो. मात्र, सेवा करण्यात त्यांना आनंद मिळतो व त्यामुळे त्यांची प्रगती होते.
मनुष्य पोटार्थी झाला, की त्याची वैश्यवृत्ती सुरू होते. त्याला जबाबदारी येते.
काही संग्रह करावा, पोटाची काळजी करावी असे त्याला वाटू लागते. तो थोडा उत्क्रांत
झालेला असतो, पण त्याला सगळे आपल्याकडे साठवून ठेवण्याचा, संग्रह करण्याचा लोभ
असतो. हा केलेला संग्रह सांभाळून ठेवायचा असल्याने त्याला भीती वाटते. सर्वांनी
शेतीतून धान्ये नेले, की शेतीत इकडेतिकडे पडलेले धान्य वेचून त्यावर आपला निर्वाह
कणाद ऋषी करत असत. कणाद हे मोठ्या योग्यतेचे होते. त्यांना राजाने धनधान्य देऊ
केले असता त्यांनी ते सर्व नाकारले. ते म्हणाले, "तुम्ही मला जे काही द्याल
त्याची मला देखभाल करावी लागेल, ते कोणी चोरणार नाही याची खबरदारी घ्यावी लागेल.'
संग्रह नेहमी भीतीला जन्म देतो. संग्रहातून आलेल्या भीतीमुळे अधोगती सुरू होते.
संग्रह आहे; पण त्याबद्दल भीती नसेल व देऊन टाकायची वृत्ती असेल, तर ती उत्तम वैश्यवृत्ती.
दुष्काळात सरकार आपली कोठारे उघडते. ही आहे वैश्यवृत्तीची उत्क्रांती.
मनुष्याने आपली बरीचशी भीती घालवलेली असते, कारण आपल्याला
सगळ्यांना माणसाळवता येते, आपल्या ताब्यात आणता येते, हे त्याच्या लक्षात आले.
क्षत्रिय प्रवृत्ती असणाऱ्यांमध्ये असा भाव प्रकट झालेला असतो, की माझ्यात
असलेल्या ताकदीमुळे मी इतरांना संरक्षण देईन. पण त्याची वैश्यवृत्ती कमी झालेली
असेलच असे नाही. अथक प्रयत्नांनी उत्क्रांतीत क्रमाक्रमाने वर चढता येते. अधोगती
होणे सोपे असते, जसे वैश्यवृत्तीचे शूद्रत्व कमी झालेले असेलच असे नाही किंवा
क्षत्रिय वृत्तीचे वैश्यत्व कमी होईलच असे नाही. आपण पृथ्वीकडे खाली ओढले जाणे
साहजिक आहे; पण त्याच्याविरुद्ध आपल्याला वर उत्क्रांत होता येणार आहे का, हे पाहणे
आवश्यक आहे. क्षत्रिय वृत्ती संरक्षणापुरती आहे. तुम्ही मला राजा केले तर मी
तुम्हाला संरक्षण देईन, असे म्हणणे हे त्यांच्यातील वैश्यत्व पूर्णतः न संपल्याचे
द्योतक आहे. प्रत्येकात हे चारही गुण अस्तित्वात असतातच. पण ज्याला आध्यात्मिक
व्हायचे आहे त्याने खाली ओढणारा स्वभाव सोडणे व वर उत्क्रांतीकडे नेणारे गुण
आत्मसात करणे आवश्यक आहे.
- डॉ . श्री. बालाजी तांबे .