- वृत्तसंस्था
- Tuesday, July 17, 2012
नवी दिल्ली - स्मार्टफोन वापरणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.
मोबाईल उत्पादनात आघाडीवर असलेल्या एचटीसी कंपनीने त्यांच्या अँड्रॉईड प्रणालीवर
चालणाऱ्या स्मार्टफोन्समध्ये आता भारतीय भाषांची जोड दिली आहे. त्याशिवाय सॅमसंग
कंपनीच्या बहुचर्चित गॅलेक्सी नोटची पुढची आवृत्ती गॅलेक्सी नोट-२ येत्या
ऑगस्टमध्ये बाजारपेठेत येऊन धडकण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
एटटीसीच्या यापुढे बाजारात येणाऱ्या सर्व स्मार्टफोनमध्ये
हिंदी, तमिळ, बंगाली आणि मराठी भाषांची जोड देण्यात येणार आहे. या भाषांमुळे
ग्राहकांना या भाषेत एसएमएस किंवा मेल वाचता आणि लिहिता येणार आहेत. चालू वर्षी या
कंपनीचे स्मार्टफोन विकत घेतलेल्या विद्यमान ग्राहकांनाही या भाषा कंपनीच्या
वेबसाईटवरून डाऊनलोड करून त्याचा वापर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली
आहे. या भाषांचा पॅक गूगल प्लेवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असे कंपनीचे
भारतातील व्यवस्थापक फैसल सिद्दिकी यांनी सांगितले.
एचटीसी कंपनीने आतापर्यंत भारतीय बाजारपेठेत एचटीसी वन एक्स,
एचटीसी वन एस, एचटीसी वन व्ही, डिझायर सी आणि डिझायर व्ही हे स्मार्टफोन्स आणले
आहेत. एचटीसी एक्स्प्लोरर आयएस क्यू ४ हा स्मार्टफोन बाजारात आणताना, लवकरच आपल्या
फोन्समध्ये भारतीय भाषांचीही जोड देण्यात येईल, अशी घोषणा कंपनीने केली होती. हे
आश्वासन कंपनीने आता पूर्ण केले आहे.
एचटीसी वन आणि डिझायर मालिकेतील सर्व स्मार्टफोन्ससाठी
कंपनीतर्फे लवकरच सॉफ्टवेअर अपडेट देण्यात येणार आहे. या अपडेटमध्ये हिंदी, मराठी
आणि तमिळ भाषा असतील. त्याशिवाय येत्या ऑगस्टमध्ये बंगाली भाषा उपलब्ध करून देण्यात
येणार आहे. ( सकाळमधून)
Posted By
ni3more