या वर्षी आलेली १२-१२-१२ ही एक क्वचितच येणारी तारीख आहे. पुन्हा अशी तारीख येण्यास एक हजार वर्षे उलटावी लागतील. यावर्षी १२ ही संख्या एकाच दिवशी तीन वेळा येत असल्याने या दिवसावर १२ या संख्येचाच प्रभाव राहील. समान अंकी तारखा या क्वचितच येतात आणि म्हणूनच ते दिवस काही खास वैशिष्ट्ये होऊन येतात. या दिवसाचे महत्त्व काय आहे ते जाणून घेणे म्हणूनच महत्त्वाचे आहे.
१२ या संख्येला आपल्याकडे अतिशय महत्त्व आहे. मूल जन्माला आले की १२ व्या दिवशी बारसे करतात व माणसाच्या मृत्यूनंतरही १२ व्या दिवशी बरेच विधी केले जातात. १२ तास झाले की अर्धा दिवस संपतो त्याचप्रमाणे वर्षाचे १२ महिने हा कालगणनेचा महत्वाचा टप्पा आहे. आपल्या शास्त्रकारांनी संपूर्ण मानव जातीला १२ राशींमध्ये समाविष्ट केले आहे. धार्मिक दृष्टीकोनातून भगवान शंकराची १२ ज्योर्तिलिंगे प्रसिद्ध आहेत. १२ हा अंक पूर्णत्वाकडे नेण्याचा संकेत देतो. उदा. १२ महिने झाल्यावर १ वर्ष संपते, १२ वाजल्यावर १ दिवस संपतो वा सुरू होतो. दुपारचे १२ हे अर्धा दिवस निश्चित संपल्याची खूण असते.एखाद्या गोष्टीचे किंवा व्यक्तीचे १२ वाजले म्हणजे त्याचा सत्यानाश झाला किंवा सर्व संपले असा अर्थ होतो. त्या अर्थाने १२ वाजले हा शब्दप्रयोग आपल्याला परिचित आहेच.
माझ्या अनेक वर्षांच्या ज्योतिष विषयक आणि इतर संशोधनातून माझे असे मत आहे की, १२ ही संख्या राहूच्या अमलाखाली येते. माझ्यामते राहू हा कर्म स्थानाचा मालक आहे आणि त्यामुळे तुम्हाला मिळालेले आशीर्वाद आणि शाप जे भूतकाळात घडून गेलेले असतात त्याचा परिणाम तुम्हाला वर्तमान काळातही जाणवतो. माणसाचे अंतर्मन साठवलेले असते आपण रोज आंघोळ करून शरीर स्वच्छ करतो, कपडे धुतो परंतु आपले मन स्वच्छ करत नाही. १२-१२-१२ या दिवशी सकाळी उठून आपण जर आपल्या अंर्तमनात साचलेली घाण, भूतकाळातील जळमटे काढून टाकली आणि अंतर्मनातील नकारात्मकता (निगेटीव्हीटी) काढून जर सकारात्मकता आणण्याचा प्रयत्न केला तर आपला फायदा होईल. कपडे धुण्यासाठी जरी वॉशिंग मशीन असले तरी मन धुण्यासाठी अद्याप मशीन निघालेली नाही. त्यामुळे हा प्रयत्न स्वत:लाच करावा लागेल.
ज्यांना शत्रूवर विजय मिळवायचा आहे व ज्यांच्या पत्रिकेत राहू अतिशय प्रभावशाली आहे त्यांनी या दिवशी शत्रू निर्मूलनासाठी योजना आखल्यास त्याचा फायदा होईल. ज्यांच्या पत्रिकेत राहू हा सकारात्मक आहे त्यांच्यासाठी अनेक चांगल्या गोष्टींचे नियोजन करणे हे अनेक पटीने फायद्याचे होऊ शकते.
या दिवसाचा फायदा घेऊन अनेक लोकांनी आपल्या व्यवसायाची सुरूवात, नवीन जागांचे उद््घाटन तसेच लग्न करणे इ. कार्यक्रम आयोजित केले आहेत. मात्र या दिवशी सुरू केलेल्या उपक्रमांचा आपल्याला फायदा होईल की तोटा, हे आपल्या पत्रिकेतील किंवा हातावरील राहूची स्थिती कशी आहे? यावर अवलंबून आहे. यासाठी जाणकारांकडून जरूर ते मार्गदर्शन घेतल्यास बरे होईल. ज्या गोष्टींना आपण शापित किंवा अशुभ म्हणतो त्यावरही १२ या अंकाचा आणि राहू या ग्रहाचा प्रभाव असतो. अशा वास्तू आणि तुमचे अंतर्मन शुद्ध करण्यासाठी हा दिवस उपयुक्त आहे. आपले वर्तमान आणि भविष्य अधिक सुकर करण्यासाठी वाचकांनी असा प्रयत्न अवश्य करावा.
- शीला तासगावकर, ज्योतिष अभ्यासक
(लोकमतवरून)
No comments:
Post a Comment